औरंगाबाद : अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाची जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणारा हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लावलेल्या सापळ्यात आडकला. ही कारवाई पैठण रोडवरील संताजी पोलीस चौकीसमोर गुरुवारी करण्यात आली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तेजराव शंकरराव गव्हाणे (वय ५७, रा. श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, मयूरपार्क) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे. ‘एसीबी’कडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला नगर हायवेवरील लुधियाना ढाब्याजवळ, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर दुचाकी घसरून तक्रारदार यांच्या मुलाचा अपघात झाला होता. यात जखमी झाल्याने त्याला घाटीत दाखल केले होते. याप्रकरणी सातारा ठाण्यात मेडिको लिगल केस (एमएलसी) नोंदविण्यात आली होती. दरम्यान, मुलगा उपचार घेऊन बरा झाल्यावर तक्रारदार यांनी पोलिसांकडे दुचाकी सोडण्याची विनंती केली. त्यांनी तशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, ‘एमएलसी’चा तपास करणारे हवालदार तेजराव गव्हाणे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांच्या मुलाचा अपघात झाला. त्यात तो जखमी झाला, हे दु:ख असताना पोलीस पैसे घेतल्याशिवाय दुचाकी सोडत नसल्याने ते आणखी संतापले. त्यांनी थेट ‘एसीबी’चे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार नोंदविली.
पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, अंमलदार रवींद्र काळे, दत्तात्रय होरकटे, सुनील पाटील, सुनील बनकर यांच्या पथकाने संताजी पोलीस चौकीजवळ सापळा रचला. हवालदार गव्हाणेने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पथकाने त्याला पकडले. गव्हाणे नोकरी करीत असलेल्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.