औरंगाबाद : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचा निषेध नोंदवित निवेदन देण्यासाठी मुस्लीम समाजातील विविध संघटना विभागीय आयुक्तालयात जाणार होत्या. तेव्हा हजारोंच्या संख्येने अचानक जमाव विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात शुक्रवारी दुपारनंतर जमा झाला. घोषणाबाजी होऊ लागली. काही हुल्लडबाज जमावाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी अतिशय संयमितपणे परिस्थिती हाताळत संभाव्य धोका टाळला.
जामा मशीद येथे शुक्रवारी दुपारची नमाज अदा केल्यानंतर जमलेले मुस्लीम बांधव निघून जातील. काही जण विभागीय आयुक्तांना निवेदन देतील, असा पोलिसांचा अंदाज होता. नमाज अदा केल्यानंतर जमाव पांगला. तेव्हा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसा संदेशही पोलीस आयुक्तांना पोहोचविण्यात आला. मात्र, त्यानंतर काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दिल्ली गेट रस्त्यावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हजारो तरुण जमा झाल्याची माहिती मिळाली. विविध घोषणा देण्यात येत होत्या. नूपुर शर्मा यांच्या छायाचित्रावर जोडे मारण्यात येत होते. त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टरही जाळण्यात आले. हा जमाव प्रक्षुब्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
जामा मशिदीच्या परिसरातील बंदोबस्तावरील सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, सिटीचौकचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक अशोक भंडारे, बेगमपुराचे निरीक्षक प्रशांत पोतदार, निरीक्षक श्यामकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळ गाठले. आयुक्तांनी जमावाला सामोरे जात शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याचवेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली. राखीव दलाची एक तुकडीही पोहोचली. पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. काही वेळातच पोलिसांची संख्या वाढली. मात्र, आयुक्तांनी अतिशय शांततेत जमावाला हाताळले. पोलीस अधिकाऱ्यांना सर्व बाजूंनी उभे केले. त्याचवेळी एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले. दोन तास घोषणाबाजी केल्यानंतर अनेक जण थकून गेले.
माजी नगरसेवकाने जमावाला उचकवले?एका माजी नगरसेवकाने ४० ते ५० दुचाकीस्वारांना आयुक्तालयाच्या परिसरात आणले. याच दुचाकीस्वारांनी रास्तारोको सुरू केला. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जमावाला बोलावून घेतले. आलेला जमाव अधिक आक्रमक झाला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या माजी नगरसेवकाच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गोपनीय विभागाला माहिती मिळाली नाही का?आंदोलन, मोर्चा, निदर्शने, सभा याबाबत अधिकची माहिती पोलिसांना असते. त्यावरच बंदोबस्ताचे नियोजन केले जाते. पोलिसांची विशेष शाखा, इंटेलिजन्स ब्युरो, गुप्तवार्ता विभागाला एवढा मोठा जमाव येणार याची माहिती मिळालेली नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांमुळे वाचला कारचालकदिल्ली गेट परिसरात आंदोलन सुरू झाल्यानंतर एक कारचालक हर्सुल टी पाॅईंटकडे जाण्यासाठी निघाला होता. गर्दीतून कार चालवताना जमाव आक्रमक झाला. चालकाला अडवून मारहाणीस सुरुवात होताच निरीक्षक प्रशांत पोतदार, अशोक भंडारे यांनी गर्दीत घुसून जमावाला रोखले. तसेच कारचालकाला रस्ता मोकळा करून दिला. या वेळेत काही टवाळखोरांनी कारच्या काचेवर दगडही मारले. त्यामुळे काच फुटली होती.
प्रत्येक ठाण्यात गस्त वाढवलीविभागीय आयुक्तालय परिसरातील घटनेनंतर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गस्त वाढवली आहे.