छत्रपती संभाजीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात दोन्ही शेजारील राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला ‘ए मेरे कुुटुंब के लोगो’ या शब्दाने साद दिली.
ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायापुढे भारताची मान ना कधी झुकली ना यापुढे कधी झुकणार नाही. शेजारील चीन राष्ट्राने चीनने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कुणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली आहे.दुसरा शेजारचा राष्ट्र दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तो यात कधीही यशस्वी होणार नाही. आम्ही शत्रूला इकडेही मारू शकतो आणि गरज पडली तर त्यांच्या देशात घुसूनदेखील मारू शकतो, असा संदेश आपल्या सैनिकांना दिला. हीच आहे भारताची ताकत, असे राजनाथ म्हणाले.
संरक्षणमंत्री झाल्यानंतर जे चित्र होते ते नवल करणारे होते. भारतीय सेनेसाठी रायफल, टँक, बाॅम्ब, मिसाइल हे दुसऱ्या देशातून आयात केले जात होते. पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, यापुढे टँक, बॉम्ब, मिसाइल जे काही असेल, ती सारी शस्त्रे आता आपल्याच देशात तयार केले जातील. सन २०१४ पूर्वी जगातील देशांना आपण ९०० कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात करत होतो. आता १६ हजार कोटींहून अधिक रुपयांची शस्त्रे निर्यात दुसऱ्या देशांना करत आहोत. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होते तेव्हा तिकडे २३ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना सोडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी बोलणी केली आणि थोड्या काळासाठी युद्ध थांबले. तिकडे अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले. जगातल्या एकाही पंतप्रधानांना जे जमले, ते आपल्या पंतप्रधानांनी करून दाखविले, असे त्यांनी सांगितले.