औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंग्याप्रकरणी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेत मशिदीवरील भोंग्याप्रकरणी आपली रोखठोक भूमिका मांडली होती. मात्र, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊदे म्हणत इशारा दिला होता. त्यामुळे राज्यात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरेंवरही आजच कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांना देखील पोलिसांनी घरी जाऊन नोटीस पाठवली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींना नोटिसा पोलिसांनी धाडल्या आहे. थोड्या वेळेपूर्वीच पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाची तपासणी करत आहेत. औरंगाबाद पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास सक्षम आहेत.
मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितले. बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीचे स्वागत केले असून पोलिसांनी आपलं काम केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.