छत्रपती संभाजीनगर : सोमवारी सायंकाळी रात्री १०.३० वाजता केंद्रीय अमित शाह शहरात इंडियन एअर फोर्सच्या विमानाने शहरात दाखल झाले. मात्र, विशेष व्हीआयपी प्रोटोकॉलच्या बंदोबस्तामुळे चोवीस तासांत पाच वेळेस जालना रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. परिणामी, शहरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रात्री शाह हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे पोहोचल्यानंतर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता ते अकोल्याकडे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ६.१६ वाजता पुन्हा ते बीएसएफच्या हेलिकॉप्टरने दाखल झाले. काही वेळ हॉटेलवर वेळ घालवून ते क्रांती चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते सायंकाळी ७.३४ वाजता सभास्थळी दाखल झाले.
शाह यांच्या झेड प्लस (विशेष) सुरक्षा प्रोटोकॉलमुळे पाच वेळेस शाह जाणार असलेले संपूर्ण मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ऐन कार्यालयीन वेळेत क्रांती चौक, सेव्हन हिल, मोंढा नाका, सिडको चौकात वाहने थांबवण्यात आली. ताफा पुढे गेल्यानंतर मागे वाहने सोडताच सर्व बाजूंनी वाहने एकत्र जमा झाली. परिणामी, कर्कश हॉर्नचा आवाज, मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
निवडणुकीपूर्वी पोलिसांसाठी 'हाय प्रोफाइल बंदोबस्ता'चा पहिला प्रयोगअमित शाह यांच्या दौऱ्यासाठी बारा तासांपेक्षा अधिक काळ शहरात १८६ पोलिस अधिकारी, १८०० पोलिस कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. शिवायबाहेरील जिल्ह्यातून ९७ पोलिस अधिकारी ४०० पोलिस अंमलदार दाखल झाले होते. यानिमित्ताने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा 'हाय प्राेफाइल बंदोबस्ताचा' पहिला प्रयोग पार पडल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले.
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच सोबत आचारसंहितेची घोषणा होईल. विविध स्थानिक, राष्ट्रीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये अनेक महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे मंत्री, नेत्यांचे शहरात नियोजित दौरे असतील. त्यामुळे शहर पोलिसांवर मोठी जबाबदारी येणार आहे. शाह यांच्या दौऱ्यानिमित्ताने मार्चच्या पहिल्याच आठवड्यात त्याची सुरुवात झाली. पोलिस उपायुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, नवनीत काँवत, शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, निरीक्षक आठ दिवसांपासून हा दौरा यशस्वी होण्यासाठी सातत्याने झटत होते.