औरंगाबाद : कुत्रा चावल्यानंतर गोरगरीब रुग्ण घाटीत धाव घेतात. परंतु याठिकाणी आल्यानंतर रेबीज लस नसल्याचे कारण सांगून खाजगी मेडिकल रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे रुग्णांबरोबर नातेवाईकांचे हाल होत आहेत. घाटीत सध्या ॲंटी रेबीज सिरमचा (एआरएस) ठणठणाट आहे. या सगळ्यात रुग्णालय प्रशासन महापालिकेकडे बोट दाखवून मोकळे होत आहे.
घाटी रुग्णालयात श्वानदंशाचे दररोज किमान १५-२० रुग्ण येतात. श्वानदंशाच्या रुग्णांना प्रारंभी अँटी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) द्यावे लागते. त्यानंतर अँटी रेबीज सिरम देण्याची गरज पडते. घाटी रुग्णालयात आजघडीला एआरव्ही उपलब्ध आहे. मात्र, एआरएस उपलब्ध नाही. घाटीत ते नाही, बाहेरून घेऊन या, असे म्हणून कर्मचारी मोकळे होतात. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना घाटी रुग्णालयाबाहेरील औषधी दुकान गाठावे लागते. ही लस खरेदी करून पुन्हा घाटीत यावे लागते. या सगळ्यात एकीकडे श्वानदंशामुळे वेदनेने रुग्ण विव्हळत असतो, तर दुसरीकडे नातेवाईकांची दमछाक सुरु असते. यामध्ये बालरुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
मोजा ३०० ते ५०० रुपयेॲंटी रेबीज सिरम (एआरएस) औषधी दुकानातून खरेदी करण्यासाठी किमान ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत. घाटी परिसरातील एका औषधी विक्रेत्याने सांगितले, आमच्याकडे रोज किमान १० ते २० ‘एआरएस’ची विक्री होते.
मागणी केली आहे.रेबीज लसीची हाफकीनकडे मागणी केली आहे. त्याबरोबर महापालिकेकडेही मागणी केली आहे. त्यांच्याकडून अद्याप ते प्राप्त झालेले नाही, असे घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी यांनी सांगितले.