औरंगाबाद - राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून साखर, हरभरा डाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला. पण, या उपक्रमात किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी साखर, तेल यांच्याशिवायच हा शिधा वाटप करावा लागला. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांपर्यंत किट वाटप करताना पुरवठा विभागाची प्रचंड दमछाक झाली. मात्र, तरीही आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचल्याचा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे.
दिवाळीच्या दिवसापर्यंत पुरवठा विभागाला रवा, हरभरा डाळ मागणीनुसार मिळाले. तेल, साखरेचा अर्धवट प्रमाणात पुरवठा झाला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला. प्रशासनाने तीन वस्तू असलेले किट प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये वाटप केल्या. अनेक ठिकाणी तेल, साखरेविनाच शिधा वाटप झाले. त्यामुळे, गोरगरीबांची दिवाळी अर्धवट आनंदानेच साजरी झाली. मात्र, कॅबिनेटमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मी स्वत: आनंदाचा शिधा वाटलाय, तोही सगळ्यांना मिळालाय, असेही ते म्हणाले.
आनंदाचा शिरा सगळीकडे पोहोचलेला असून मी स्वतः शिधा वाटप केलेला आहे. सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली आहे, असा दावा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केलाय. कुठे साखर पोहोचली नाही, कुठे तेल पोहोचलं नाही, कुठे शिधा पोहोचला नाही असं म्हणणे हे विरोधकांचे कामच आहे, असा टोला देखील भुमरे यांनी विरोधकांना लगावला आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावे यासाठी गावात आनंदाच्या शिधाचे वाटप होत आहे. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही, असंही भुमरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची घोषणा आम्ही पूर्ण केली
उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले, त्यांनी दौरा केला ते बांधावर गेले. आमचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. त्यांनी स्वतः पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसानीचा आकडा आल्यानंतर शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा बारा महिन्यांपूर्वी केली होती. ती अमलात आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेले आहे. आमचं सरकार नुसत्या घोषणा करत नाहीत. उद्धव ठाकरेंनी वर्षभरापूर्वी जाहीर केलेलं पन्नास हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळालं आहे, असेही भुमरे यांनी म्हटलं.