खुलताबाद (औरंगाबाद): जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही जागतिक वारसा स्थळ आहे. येथे बौद्ध,हिंदू आणि जैन लेण्या आहेत. यातीलच दहा नंबरच्या लेणीतील बुध्द मूर्तीवर वर्षातून केवळ दोनच दिवस अलौकिक असा किरणोत्सव होतो. सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती आणि प्रकाशमान झालेली संपूर्ण लेणी हे दृष्य डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांनी येथ गर्दी केली आहे. १० व ११ मार्च रोजीच सूर्यकिरणे येथील बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावर येतात.
कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरात अथवा प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात होणारा किरणोत्सव आपण अनेकदा पाहिला , अनुभवला असेल. सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात हे दृष्य पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव असतो. अशाच प्रकारचा किरणोत्सव ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ येथील दहा नंबरच्या लेण्यातील बुद्ध मूर्तीवर अनुभवायला मिळतो. मात्र, हा नजारा वर्षातील १० व ११ मार्च या दोनच दिवशी अनुभवता येतो. यामुळेच या दोन दिवसात हजारो पर्यटकांची पाय लेणीकडे वळतात.
स्थापत्य कलेचा अद्धभुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण ३४ लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणात जात असताना सूर्यकिरणे येत असतात . हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती गुरूवारी आली. हा सूर्यकिरण सोहळा पाहण्यासाठी इतिहासतज्ज्ञ डॉ संजय पाईकराव, डॉ. कामाजी डक, डॉ. भाऊसाहेब कुऱ्हाडे, अश्विन जोगदंड, योगेश जोशी, स्वप्नील मगरे, करण कौठेकर, विशाल गवई, अक्षय बचके आदीसह ५० पर्यटक वेरूळला आले होते.
बौद्ध कला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरणयाकाळात बुद्ध मूर्तीवर होणारा किरणोत्सव म्हणजे बौद्ध कला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सूर्यकिरणे बुद्धमूर्तीवर पडणे म्हणजे किरणांची सूर्याशी भेट, असेच म्हणावे लागेल.- डाॅ. संजय पाईकराव, बौद्ध कला व स्थापत्याचे अभ्यासक