- संजय जाधवपैठण: राधाकृष्णांच्या होळी गिताच्या जल्लोषात राजस्थान नाथद्वाराच्या विशेष गुलालासह लाखो गुलाब पाकळ्यांची उधळण करून मंगळवारी धुलीवंदनानिमित्ताने नाथांच्या मंदिरात आगळा वेगळा 'फाग उत्सव' साजरा करण्यात आला. फाग उत्सवात गुलालाची व फुलांची उधळण करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरूष भाविकांनी हजेरी लावल्याने मंदिर खचाखच भरले होते. विविध रंगाची उधळण करत सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात येते. मात्र पैठण येथील नाथांच्या मंदीरात रंगा ऐवजी विविध फुलांची उधळण करून ' फाग उत्सव ' साजरा करण्यात आला.
होळी उत्सवा संबंधी मराठी, ब्रजभाषा, हिंदी, राजस्थानी आदि भाषांचे विविध भजन, गवळणीचे गायन करण्यात आल्याने मंदिरात जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले. नाथ मंदिरात रंगाच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून रंगपंचमी साजरी होते. यासाठी यंदा सुगंधीत चैत्री गुलाब इंदौर, जालना, सांगली, पुणे अशा विविध भागातून मागवण्यात आला होता. तर गुलालाची उधळण करण्यासाठी विशेष गुलाल नाथद्वारा (राजस्थान) येथून आणला होता. मंगळवारी दहा क्विंटल फुले उधळून मंदिरात फाग महोत्सव साजरा करण्यात आला असे गोवत्स परिवाराचे गणेश महाराज लोहीया यांनी सांगितले. फाग उत्सवात बद्री महाराज नवल, किशोर चौहान,आनंद लोहिया,पवन लोहिया, नाथवंशज मिलिंद गोसावी, श्रेयस गोसावी, पुष्कर गोसावी,परीक्षीत गोसावी,पुष्कर लोहिया,योगेश लोहिया,बलराम लोळगे, विनय रावस, हार्दिक सराफ, गणेश लोहिया,श्रीकांत सारडा, मधुसूदन मुंदडा, आदीसह मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन आनंद लुटला.