- संतोष हिरेमठऔरंगाबाद : पीटलाईनच्या प्रतीक्षेत औरंगाबादकरांची वर्षानुवर्षे गेली. या सगळ्यात ६ महिन्यांपूर्वी जालन्यात पीटलाईनची घोषणा झाली, निविदाही निघाली आणि आता भूमिपूजनाची लगीनघाई सुरू आहे. मात्र, औरंगाबादची पीटलाईन अजूनही कागदावरच आहे.
रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद व नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारीला जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाईन करण्याची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही जिल्ह्यांना दिलासा दिला. जालन्यात निविदाही निघाली. आता भूमिपूजनाची तयारी सुरू आहे, परंतु औरंगाबादेत निविदा प्रक्रिया कधी होणार, अशी ओरड आहे.
१६ बोगींची पीटलाईनऔरंगाबादेत १६ बोगींच्या पीटलाईनसाठी २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चिकलठाण्याऐवजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरच ही पीटलाईन होणार आहे. पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांबपल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचा थेट फायदा औरंगाबादच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला होणार आहे. परंतु औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
जालन्यात तत्काळ निविदाजालन्यात पीटलाईनला मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. लवकरच भूमिपूजनही होत आहे. औरंगाबादेतील मंजूर पीटलाईन मंजूर झाली आहे. किमान आता आगामी महिनाभरात निविदा प्रक्रिया राबविली पाहिजे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
लवकरच निविदाऔरंगाबादच्या पीटलाईनची लवकरच निविदा निघेल. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात मी आहे.- डाॅ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री