-राम शिनगारे छत्रपती संभाजीनगर : पोलिस शिपाईपदाच्या कागदपत्रांची तपासणी व मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांसाठी २ एप्रिल रोजी राज्यभरात (मुंबई शहर वगळून) लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी एकाच अर्जाची परवानगी असताना शेकडो उमेदवारांनी नियमाचा भंग करीत अनेक जिल्ह्यांत अर्ज करून मैदानी चाचणीत सहभाग नोंदवला. त्यामुळे नियोजित लेखी परीक्षा पुढे ढकलावी किंवा स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. राज्यात पोलिस शिपाईपदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवाराला राज्यात एकाच ठिकाणी अर्ज दाखल करण्याची मुभा होती. मात्र, अनेक उमेदवारांनी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले. त्यासाठी वेगवेगळे ई-मेल, मोबाइल नंबर वापरले.
पोलिस भरतीसाठी कागदपत्रांच्या तपासणीसह मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी असल्यामुळे अनेक ठिकाणी अर्ज करणाऱ्यांना विविध ठिकाणी सहभागी होता आले. त्याचा परिणाम एकच उमेदवार अनेक जिल्ह्यात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरला. मात्र, हा उमेदवार एकाच ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकणार आहे. त्याचा फटका इतर उमेदवारांना बसला. एखादा गुण कमी पडलेले उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरले नाहीत. यामुळे २ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा स्थगित करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उमेदवार राहुल चव्हाण यांच्यासह इतरांनी ॲड. विनोद राठोड यांच्यामार्फत खंडपीठात सादर केली आहे.
१८ लाख जणांनी भरले होते अर्ज
पोलिस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलिस बलातील १८ हजार ३३१ जागांसाठी १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पोलिस शिपाईपदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी १२ लाख २५ हजार ८९९ अर्ज, चालक पोलिसपदाच्या २ हजार १७४ जागांसाठी २ लाख १५ हजार १३२ आणि राज्य राखीव पोलिस दलातील १ हजार २०१ जागांसाठी ३ लाख ७१ हजार ५०७ जणांनी अर्ज केले होते.