औरंगाबाद : स्मार्ट सिटी तर्फे मिटमिटा येथे सफारी पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले. पार्कच्या जागेवर एका वाळू माफियाने वाळू धुण्यासाठी मोठे सेंटर उभे केले असून,अनधिकृत वीज ही घेतली होती. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पाहणी करून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला.
सफारी पार्क पर्यंत रस्त्यासाठी भूसंपादन करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मंगळवारी प्रशासक पाण्डेय यांनी नगररचना, अतिक्रमण, मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांसह सफारी पार्कची पाहणी सुरू केली. पार्कच्या जागेवर ज्या ठिकाणी पाण्याचा छोटा तलाव आहे, तेथे एक वाळू माफिया अनेक वाहनांमधील वाळू धूत असल्याचे निदर्शनास आले. पाण्याचा उपसा करण्यासाठी मोठमोठ्या मोटारी लावल्या होत्या. अनधिकृत वीज घेतली होती. वाळू माफियाने या भागात दहशत निर्माण केली होती. तो स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला कामही करू देत नव्हता. प्रशासकांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. सुनील चव्हाण अधिकाऱ्यांसह थोड्याच वेळात घटनास्थळी हजर झाले. वाळू माफियाकडे वाळू उपसा केल्याचे कागदपत्रही समाधानकारक नव्हते. छावणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून संबधित वाळू माफियावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. जेसीबी, टिपर आदी साहित्य जप्त करण्यात आले. महावितरणतर्फे वीज चोरी बद्दल कारवाई करण्यात आली.
अतिक्रमणांचा विळखासफारी पार्कच्या जागेवरील सर्व अतिक्रमणांचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासक पाण्डेय यांनी घेतला. स्मार्ट सिटी आणि मनपाचे अधिकारी संयुक्तरीत्या कारवाई करतील. सफारी पार्कच्या जागेवर अलीकडेच वेगवेगळी धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत.
रस्त्यासाठी भूसंपादनसफारी पार्कला जाण्यासाठी रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी मनपाच्या नगर रचना विभागाने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश दिले.