औरंगाबाद : ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेला काय ?’ हे पावसाळी गीत सर्व परिचित आहे. मात्र, बालाजीनगर परिसरातील शाळेत पावसाचे नव्हे तर ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने शाळेला गुरुवारी सुट्टी द्यावी लागली आहे.
बालाजीनगर आणि महूनगर परिसरातील कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूलच्या समोरच्या मैदानात ड्रेनेजचे पाणी तुंबले आहे. गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या समस्येबाबत महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने असुविधेमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागत आहे. अशा सूचनाच शाळेच्या फलकावर मुख्याध्यापकांनी लिहिली आहे. शाळेच्या मुख्याध्यापक सुलभा वट्टमवार म्हणाल्या, शाळेच्या संरक्षक भिंतीबाहेरून मुख्य ड्रेनेजलाईन जाते. ही लाईन चोकअप झाल्यावर ड्रेनेजचे उलटे पाणी शाळेच्या प्रांगणात जमा होते.
यासंदर्भात वॉर्ड फ ला गेल्या तीन वर्षांपासून पत्रव्यवहार, पाठपुरावा करत आहोत. मात्र, पावसाळ्यास जास्त त्रासाच्या वेळेसही सहकार्य मिळत नाही. आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्गंधी, डासांचा उच्छाद झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुरुवारी शाळेला नाईलाजाने सुट्टी देण्यात आली. शुक्रवारी ग्राऊंडमधील ड्रेनेजचे पाणी कमी झाले तर शाळा भरवू, अन्यथा सुट्टी द्यावी लागणार आहे. मनपाने शाळेच्या समस्येला प्राधान्य द्यायला हवे.
दुर्गंधीत विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातड्रेनेजच्या पाण्याची दुर्गंधी, त्यावरील माशा आणि डासांच्या उच्छाद वाढला आहे. वारंवार शाळेने पत्रव्यवहार, पाठपुरावा केला. तरी तीन वर्षांपासून या समस्येपासून सुटकारा मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना नाका-तोंडाला रूमाल लावून शाळेत यावे लागते, अनेक विद्यार्थी आजारी पडले. पालकांच्या तक्रारीही वाढल्याने गुरुवारी शाळा भरवता आली नसल्याचे शाळेचे कलाशिक्षक राजेश निंबेकर म्हणाले.