छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात तीन अल्पवयीन मुलींचा गुंडांनी अपहरणाचा प्रयत्न केला. यापूर्वीही विद्यापीठात अशा प्रकारच्या गंभीर घटना घडल्या. तरीही हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या विद्यापीठात अद्यापही पुरेसे व अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासाची भिस्त आता स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरच अवलंबून आहे.
विद्यापीठ परिसरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलाॅजी (नायलेट) संस्था आहे. येथे शिकणाऱ्या तीन मुली सायंकाळी वसतिगृहाच्या बाहेर पडल्या होत्या. फिरत फिरत वाय पॉईंटसमोरून त्या पुन्हा वसतिगृहाच्या दिशेने जात होत्या. तेव्हा अचानक समोर आलेल्या तीन बुलेटस्वारांनी त्यांचा रस्ता अडवला. मुलींनी दुर्लक्ष करून पुढे जाण्यास सुरुवात केली. मात्र, गुंडांनी छेड काढण्यास सुरुवात केली. एका दुचाकीस्वाराने खाली उतरून विद्यार्थिनींचा हात पकडण्याचा प्रयत्न करत गाडीवर बसण्याची दमदाटी केली. मात्र घाबरलेल्या मुलींचा आरडाओरड ऐकून आसपासच्या विद्यार्थ्यांनी धाव घेतली. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री विनयभंग, बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक रेखा लोंढे यांनी सांगितले. उपनिरीक्षक हारुन शेख अधिक तपास करत आहेत.
अद्ययावत सीसीटीव्हींचा अभावआरोपींनी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला तर पळ मात्र लेण्यांच्या बाजूने केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, विद्यापीठात पुरेसे पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. वाय पॉईंटला स्मार्ट सिटीचा एक कॅमेरा आहे. त्याशिवाय पोलिसांनी बाहेरील परिसरातील फुटेज गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.
एवढी हिंमत होते कशी?-पुंडलिकनगर मध्ये पाच दिवसांमध्ये महिलांच्या संबंधित पाच गंभीर घटना घडल्या. त्यानंतर विद्यापीठात सायंकाळी गुंड घुसून मुलींना मुख्य रस्त्यावर अडवणूक करतात. रहदारी असलेल्या ठिकाणी खुलेआम असे प्रकार घडत असल्याने पोलिस विभाग कुठे आहे? असा प्रश्न विद्यापीठातील मुलींनी विचारला. शहरात गुंड, गुन्हेगारांची एवढी हिंमत होती कशी, पोलिसांचा धाक संपलाय का? असे प्रश्नही मुलींनी विचारले.