कन्नड (औरंगाबाद) : शहरातील चाळीसगाव रोडवरील विश्रामगृह परिसरातील फर्निचरच्या दुकानासमोरील टेबलवर मोबाईलच्या रिकाम्या खोक्यात गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होती. गुरुवारी दुपारी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तांत्रिक पद्धतीने स्फोट घडवून तो नष्ट केला. मात्र, शहरात आढळलेल्या या बॉम्बमुळे नागरिकांत खळबळ उडाली हाेती.
गुरुवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान एका फर्निचर दुकानाचे मालक किरण राजगुरू आपल्या दुकानावर पोहोचल्यावर दुकानाबाहेरील टेबलवर त्यांना मोबाईलचे खोके चिकटपट्टीने चिकटवलेले दिसले. ते खोके उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी त्यांचे भाऊ किशोर यांना कळवले. किशोर राजगुरू यांनी दुकानावर जाऊन त्या बॉम्बसदृश्य वस्तूचे फोटो काढले आणि ही गोष्ट शहर पोलिसांना कळविली. यानंतर निरीक्षक राजीव तळेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव हेसुद्धा घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान सुमारे शंभर फुटांवर दोन्ही बाजूने बॅरिकेट लावून रस्ता निर्मनुष्य करण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास बॉम्ब शोधक व नाशक पथक आले. त्यांनी बॉम्ब नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी बॉम्ब नाशक पथकाने सिंचन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात मोकळ्या जागेत या गावठी बॉम्बचा तांत्रिक पद्धतीने स्फोट घडवून आणला. बॉम्बचा मोठा आवाज झाल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा श्वास सोडला.
हा बॉम्ब गर्दीच्या ठिकाणी ठेवलेला नव्हता; शिवाय त्याची क्षमता एका व्यक्तीला हानी पोहोचेल एवढीच होती. बॉम्ब बनविताना कशाचा वापर झाला, याची तपासणी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, फटाक्यांतील दारूचा उपयोग केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली. बॉम्ब शोधक पथकाचे पोउपनि महेश घिर्डीकर, रामचंद्र म्हात्रे, राम गोरे, धरमसिंग डेडवाल, सुनील दांडगे, मंगल सिंग जारवाल, रोहित जाधव यांचा समावेश होता.