छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्याचे संकट काही केल्या कमी होत नाही. जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे वारंवार फुटत आहे. तर, कधी वीजपुरवठा खंडित होत आहे. जलवाहिन्यांना गळती लागण्यामुळेही पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पैठण रोडवरील ढोरकीनजवळील १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवारी फुटल्यामुळे शहर पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणा युद्धपातळीवर कामास लागली.
जायकवाडी पंपगृह वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी पाच मिनिटांसाठी खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत होताच, मुख्य जलवाहिनीमधील पाण्याचा दाब वाढल्याने जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीतून मोठ्या दाबाने बाहेर आलेले लाखो लिटर पाणी रस्त्यावरून शेतात शिरले. मनपाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला. परिणामी एक दिवसाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० आणि १२०० मि.मी.च्या जलवाहिन्यांची वहन क्षमता संपली आहे. त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील अंतर्गत जलवाहिनी दोन ठिकाणी फुटली. त्यानंतर जायकवाडी पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एक दिवस गेला. हे शुक्लकाष्ट संपत नाही तोवर गुरुवारी १२०० मि.मी. जलवाहिनीचे वेल्डिंग निखळून ती फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. अर्धा तास पाणी रस्त्यावरून शेतात जात होते. पाण्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल होऊन वाहतूकही ठप्प झाली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.एम. फालक तातडीने ढोरकीनकडे रवाना झाले.
पाणीपुरवठ्यासाठी तारेवरची कसरत...शहरातील सिडको-हडको, शिवाजीनगर व इतर भागाला १२०० मि.मी. जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागातील काही टप्पे एक दिवसाने पुढे ढकलले जाणार आहेत. ७०० आणि ९०० मि.मी.च्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचे मनपाने नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी मनपाची तारेवरची कसरत सुरू आहे.
दुरुस्तीसाठी १५ तास लागणार...जलवाहिनीचे वेल्डिंग गळून गेल्याने ती फुटल्याचा अंदाज आहे. जलवाहिनी कोरडी होण्यास सहा ते सात लागले, त्यानंतर दुरुस्ती सुरू झाली. दुरुस्तीसाठी १५ तास लागणे शक्य आहे. जुन्या शहराला ७०० च्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याने ९०० मि.मी.च्या जलवाहिनीतून काही भागाला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे अभियंता फालक यांनी सांगितले.