छत्रपती संभाजीनगर : शनिदेव म्हटले की, काळ्या पाषाणातील मूर्ती नजरेसमोर येते. पण, छत्रपती संभाजीनगरातील एक शनिदेव शेंदूरवर्णीय आहे, हे वाचून आपणास आश्चर्य वाटेल. धावणी मोहल्ल्यातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिदेवाला चक्क शेंदूर लावला जातो. यामुळेच केशरिया शनी महाराज मंदिर, असे या मंदिराचे नाव पडले आहे. अशा प्रकारचे हे बहुधा एकमेव मंदिर असावे.
हनुमान, गणपती, शनीच्या स्वयंभू मूर्तीधावणी मोहल्ल्यातील मंदिर हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. बजरंगबलीच्या उजव्या बाजूला शनी महाराज, तर डाव्या बाजूला गणपती बाप्पा आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या या स्वयंभू मूर्ती असल्याचे येथील भाविक सांगतात. श्रीगणेश, श्रीहनुमान व श्रीशनिदेव या तिन्ही देवता येथे शेजारीच आहेत, हेही विशेष.
का लावतात शनिदेवाला शेंदूर?दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी लोकेश दवे (कृष्णा व्यास गुरुजी) यांनी सांगितले की, त्यांची पाचवी पिढी या मंदिरात पूजा-अर्चना करीत आहे. ५० वर्षांपूर्वी या मूर्ती उचलून उंच गाभाऱ्यावर ठेवण्यासाठी मूर्तीभोवती खोदकाम करण्यात आले. ५० फूट खोल खोदल्यानंतरही मूर्तीचा पाया दिसून आला नाही. खोलवर पाषाणच होता. या मंदिरातील मुख्य देवता हनुमान आहे. तसेच, गणपतीही असल्याने या दोन्ही देवतांना शेंदूर लावला जाते. यामुळे शनिदेवालाही शेंदूर लावण्यात येतो. ही चार शतकांची परंपरा आहे.