- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : शनिवारी लग्नसराईच्या पहिल्याच दिवशी शहरात ७० विवाह लागले. लग्नमुहूर्त जवळ येताच ‘नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या’ अशी घोषणा स्टेजवरून झाली आणि जमलेल्या शेकडो वऱ्हाडींमधून नवरी व नवरदेव एक-एक पाऊल पुढे टाकत स्टेजकडे जात होते. यावेळी बँड पथकातील मास्टर क्लॅरिओनेटवर ‘बहारो फूल बरसाओ’ हे गीत वाजवत होते.
हे गाणे लग्नात वाजविण्याचा पहिला प्रसंग नव्हे... ५६ वर्षांत देशात कोट्यवधी विवाह लागले, त्यातही नवरदेवाच्या आगमनाला हेच गाणे वाजविण्यात आले. जणू या गाण्यामुळे अनेकांच्या संसाराला सुरुवात झाली.
सदाबहार गीत‘बहारो फूल बरसाओ’ हे गाणे कानी पडल्यावर प्रत्येकाला आपल्या लग्नाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजेंद्र कुमार व वैजयंतीमाला यांच्या अभिनयाने नटलेला ‘सूरज’ चित्रपट १९६६ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकला. यासाठी हसरत जयपुरी यांनी हे गीत लिहिले. त्यास शंकर जयकिशन यांनी संगीत दिले आणि स्वरांचे सरताज महंमद रफी यांनी गायले. विवाहप्रसंगी ते चपखल बसते. त्यानंतर असंख्य गाणी आली; पण या गाण्याची जागा कोणी घेऊ शकले नाही.
पूर्वी वराती याच गाण्यावर करत डान्सशहरात पूर्वी स्वा. मास्टर गनिमिया, मास्टर मेहमूद, मास्टर सय्यद अकबर ‘बहारो फूल बरसाओ’ हे गीत क्लॅरिओनेटवर वाजवत तेव्हा एका लग्नात शेकडो रुपये इनाम म्हणून बँड पथकाला मिळत. आता मात्र, वरातीत ‘भांगडा ते मुंगडा’ गाणे तर लग्नमंडपात नवरदेव-नवरीच्या आगमनाला ‘बहारों फूल बरसाओ’ हेच गीत वाजविले जाते. याच गाण्याने बँड पथकांना व कलाकारांची जगण्याची मोठी सोय केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.- सय्यद आजम, मालक, ब्रास बँड पथक
विविध गाणी आहेत; पण...मध्यंतरी ‘नवरी आली’ हे गीतही याप्रसंगी वाजविले जात होते. काळानुरूप गाण्यात बदल होत असतात. मात्र, ‘बहारो फूल’ या गीताला तोड नाही.- गौरव खरवडकर, इव्हेंट मॅनेजमेंट