औरंगाबाद : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ए.एस. क्लब ते करोडी रस्त्यावर घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अक्षय परसराम सिनकर (२६, रा. औरंगाबाद मूळ रा. बुलडाणा) आणि अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही, तर जखमीचे नावही समजू शकले नाही. घटनेविषयी पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री अक्षयसह तीन जण एका मोटारसायकलवरून ए.एस. क्लबकडून करोडीमार्गे भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी जात होते. ए.एस. क्लबपासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर एका भरधाव कारने (क्रमांक एमएच २८ एझेड ५४२६) त्यांना उडवले. यामुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. तर एक जण दुसरीकडे फेकल्या गेला. याचवेळी तेथून वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रकने रस्त्यावर पडलेल्या अक्षयसह अन्य एकाला चिरडले.
या भीषण अपघातात ट्रकचे चाक अनोळखी तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला, तर अक्षयच्या शरीरावरून वाहन गेल्याने तोही घटनास्थळीच ठार झाला. दुचाकीस्वार तिसरा तरुण अन्य ठिकाणी फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्यांना उडविणारी कार पुढे काही अंतरावर जाऊन थांबली, तर त्यांच्या अंगावरून गेलेल्या वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून वाहनांसह धूम ठोकली. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वाव्हळे आणि हवालदार रणवीर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमीला तात्काळ घाटीत हलविलेया अपघाताची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शींनी रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावून घेतली. यानंतर पोलिसांच्या मदतीने जखमीला तात्काळ घाटी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह घाटीतील शवागृहात हलविले, तसेच कार ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.