छत्रपती संभाजीनगर : उन्हाच्या काहिलीने मानवच नव्हे तर पक्ष्यांनाही उष्माघाताचा फटका बसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वसाहतीत एक कबूतराचे पिल्लू खाली पडून जखमी झाले. त्याला दाणापाणी देऊन औषधोपचार करण्यात आले. हे पिल्लू कडक उन्हात अचानक पडून तडफडू लागले.
हे सोहम शिंदे यांनी लाईफ केअरचे सचिव जयेश शिंदे यांना कळविले. मग त्याला सुखरूप घरी आणून दाणापाणी देण्यात आले. याआधी एक चिमणी पाण्याची शोधाशोध करताना दिसून आली. बुधवारी शहरातील तापमान ४०.२ अंश डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले. पोपट, कबूतर, चिमणी, कावळा व अन्य जखमी पक्षी यांची काळजी लाइफ केअर संस्थेमध्ये घेण्यात येत आहे.
आपल्या परिसरात कुठलाही पशुपक्षी आढळल्यास संस्थेशी संपर्क साधून या मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्याच्या कार्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवा, असे आवाहन लाइफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सचिव जयेश शिंदे यांनी केले आहे.
मातीचे भांडे ठेवा... प्लास्टिक व इतर भांडे टाळा..पक्ष्यांना बोलता येत नाही, परंतु दाणा-पाणी योग्य स्थळी ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. उन्हामुळे पक्ष्यांनाही उष्माघात होतो. हे टाळण्यासाठी हा छोटासा प्रयत्न हवा.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य