- संजय जाधवपैठण : कमी खोलीचा व उथळ असा विस्तीर्ण पानपसारा लाभल्याने नाथसागराच्या जलाशयात खोलवर सूर्यकिरणे पोहोचतात. यामुळे बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा प्रकल्प म्हणून जायकवाडी प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तापमानात वाढ झाल्याने यंदा आतापर्यंत २४३.११६ दलघमी (८.५८ टीएमसी) पाणी बाष्पीभवनाने जलाशयातून कमी झाल्याचे पुढे आले आहे. बाष्पीभवनाने कमी झालेल्या पाण्यात जायकवाडीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना साधारण दोन वर्षे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो, यावरून बाष्पीभवनाची तीव्रता किती आहे हे समोर येते. जायकवाडी धरणात आजच्या स्थितीत १२५३.६४१ दलघमी (५७.७४ टक्के) एवढा उपयुक्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला तो ५६.६२ टक्के एवढा होता, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
तापमानाचा पारा वाढत असल्याने जायकवाडीच्या जलाशयातील बाष्पीभवन प्रक्रिया गतीने वाढली. विशेष म्हणजे १७ एप्रिलला जवळपास दोन दलघमी (१.८१) बाष्पीभवन झाल्याची नोंद असून, यंदाचा बाष्पीभवनाचा हा उच्चांक आहे. जायकवाडी धरणातून सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेेत जवळपास ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले असून, ही चिंताजनक बाब आहे. सन २०१६ व २०१९ ला मार्च महिन्यापासूनच जायकवाडीच्या मृत साठ्यातून पाणी उचलण्याची वेळ ओढवली होती. या काळात बाष्पीभवन प्रक्रियेने वाया जाणाऱ्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. जायकवाडी धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज, शेंद्रा, पैठण, जालना औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ०•२८९ दलघमी एवढा पाणीपुरवठा होतो. आजच्या तारखेस या उलट केवल बाष्पीभवन प्रक्रियेत याच्या सहापट म्हणजे १.८१ दलघमी पाणी बाष्पीभवन प्रक्रियेत नष्ट होत आहे. दरम्यान, यंदा धरणात जलसाठा चांगला असून, येणाऱ्या हंगामात प्रत्यक्षात पाऊस कसा राहील हे सांगता येत नसल्याने धरणात अपेक्षित जलसाठा असणे भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
बाष्पीभवन प्रक्रियेस प्रतिबंध करणे अवघडबाष्पीभवन प्रक्रियेची गती कमी करण्यासाठी जलाशयावर रसायने फवारण्याचा अवलंब केला जातो. परंतु, जायकवाडीचा पानपसारा हा ३५ हजार हेक्टर असा विस्तीर्ण असल्याने अशी उपाययोजना करणे शक्य नसल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.
तरंगते सोलार प्लेटचा वापर?जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तीर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा होत आहे. सोलार प्लेटने बाष्पीभवन प्रक्रियेचा वेग घटविता येईल व विद्युत निर्मितीही होईल अशा पद्धतीची विचारधारा जायकवाडी प्रशासनात चर्चिली जात आहे. मात्र, पक्षी अभयारण्यामुळे या योजनेला वनखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. परंतु, असे प्रमाणपत्र मिळणे अवघड असून, सध्यातरी याबाबत प्रशासकीय स्तरावर कुठल्याच हालचाली नाही.
गत सात दिवसांत झालेले बाष्पीभवनतारीख | बाष्पीभवन(दलघमी)१२/४/२२ | १.५९१३/४/२२ | १.६४१४/४/२२ | १.५५१५/४/२२ | १.४६१६/४/२२ | १.५११७/४/२२ | १.८११८/४/२२ | १.७८