हतनूर : कन्नड तालुक्यातील शिवराई, भोकनगावच्या शेतकऱ्यांनी विविध कृषी दुकानांतून विकत घेतलेले मधुमकाचे बियाणे बोगस निघाले आहे. सदरील मका तर उगवून आली, मात्र, त्या ताटांना कणसेच आली नसून ती वांझोटी निघाली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खरिपाचे उत्पन्न वाया गेले आहे.
तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मे ते जून महिन्यात मधुमकाची लागवड करतात. शिवराई व भोकनगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रांमधून नांगो सिड्स कंपनीचे मधुमकाचे बियाणे अडीच हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी करून लागवड केली. सदरील बियाणे चांगले उगवले मात्र ते वांझोटे निघाले आहे. त्यातील अनेक ताटांना कणसेच लागली नाहीत, ज्या ताटांना कणसे लागली, त्यात दाणेच भरले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत, बियाणे खर्च, कीटकनाशक फवारणी, रासायनिक खते, असा सर्वच लागवड खर्च तर वाया गेलाच आहे. त्यात खरीप हंगामही वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाई देण्याची मागणी कल्याण नागरे, रावसाहेब मुठ्ठे, रामदास नागरे, काकासाहेब शिंदे, युवराज गिरी(सर्व रा. शिवराई), राजू खरे, राहुल नलावडे, किशोर नलावडे (सर्व रा. भोकनगाव) यांसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी सोमवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयात दाद मागू शकतातशिवराई व भोकनगाव येथील शेतकऱ्यांच्या मकाविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या शेतात पाहणी केली. खरोखरंच मकाच्या झाडाला जी कणसे आली ती वांझोटी निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही पंचनामा केला असून पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल.चार ते पाच दिवसांत अहवाल सादर केला जाईल. कंपनीने शेतकऱ्यांना जर नुकसानभरपाई दिली नाही, तर शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतात, असा कायदा आहे.-बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी, कन्नड
नुकसानभरपाई द्यावी बियाणे कंपनीच्या विश्वासावर आम्ही बियाणे खरेदी करून ते जमिनीत पेरतो. शंभर टक्के खर्च करून जर उत्पन्न हातात येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे. आमचा झालेला खर्च व हंगाम वाया गेला असून आज मधुमकाला चांगला दर असताना उत्पन्न मिळाले नाही. नांगो कंपनीने आमचे नुकसानभरपाई करून द्यावी ही आमची मागणी आहे.-रावसाहेब मुठ्ठे, शेतकरी, शिवराई