छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेत नुकतीच अनुकंपा तत्त्वावर वर्ग-३ आणि वर्ग-४ पदासाठी भरती झाली. आतापर्यंतच्या १६८ उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतून ज्येष्ठतेनुसार ३४ जणांची सामान्य प्रशासन विभागाने निवड केली. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले.
अभियांत्रिकी, एमएस्सी., एमसीए, एलएलबी पदवीधारक २२ तरुणांनी वर्ग ४ प्रवर्गात शिपाई पदाची नोकरी स्वीकारली आहे. जिल्हा परिषदेने अलीकडच्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या १६८ जणांची प्रतीक्षा यादी आहे. या यादीतून ३४ तरुणांना जि.प.ने नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. प्रतीक्षा यादीनुसार या भरतीमध्ये ३४ पैकी १२ जणांना वर्ग-३, तर २२ जणांना वर्ग-४ प्रवर्गात शिपाई पदावर पदस्थापना देण्यात आली असल्याचे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी सांगितले.
वर्ग-३ मध्ये जास्त जागा रिक्त नसल्यामुळे उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांना वर्ग-४ चा पर्याय स्वीकारला. यासंदर्भात प्रशासनाने तुमच्या शिक्षणाला शिपाई पदाची नोकरी शोभा देणारी नाही, थोडे थांबा, असा सल्ला दिला होता. पण, बेरोजगारीने होरपळलेल्या तरुणांनी कुटुंब चालविण्यास हातभार लावण्यासाठी शिपाई पदाची नोकरीही चालेल, अशी तयारी दर्शविल्यामुळे प्रशासनाला अखेर अशा २२ उमेदवारांना पदस्थापना द्यावी लागली. यातील अनेक तरुण वकील, इंजिनिअर, पदव्युत्तर पदवीधारक आहेत.