औरंगाबाद : बजरंग चौकात कुटुंबियांसोबत चालत जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील एकट्या दुचाकीस्वराने मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. हे मंगळसूत्र हिसकाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीस सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. या आरोपीकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शेख शोएब शेख अमीन (२८, रा. मोतीकारंजा) असे रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत बजरंग चौकात एका विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र १६ जानेवारी रोजी रात्री १०.१५ वाजता हिसकावले होते. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसानी धीर देत आरोपीच्या शोधासाठी विविध पथके स्थापन केली होती. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना सदरील घटनेतील आरोपी हा मोतीकारंजा भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार त्यांनी विशेष पथकाचे उपनिरीक्षक राेहित गांगुर्डे, हवालदार मुनीर पठाण, शाहेद पटेल, सोहेल पठाण आणि अभिजीत गायकवाड यांना सापळा लावण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावल्यानंतर आरोपी शेख शोएब हा दुचाकीवर (एमएच २० एफएक्स ६४८८) घटनास्थळी आला. तेव्हा पोलिसांच्या पथकाने पकडले. चौकशीत त्याने सोबत असलेल्या दुचाकीवरच बसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. तसेच हे मंगळसूत्र सिटीचौक परिसरातील सराफाला विकल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी सराफाकडून विकलेले मंगळसूत्र हस्तगत करीत दुचाकीही जप्त केली. आरोपीसह हस्तगत मुद्देमाल सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
तब्बल २२ मोबाईल चोरलेपोलिसांनी पकडलेला आरोपी शेख शोएब याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. त्याने चोरलेले तब्बल २२ मोबाईल पोलिसांना परत दिले होते. त्याशिवाय दोन मंगळसूत्रांचीही त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांनी दिली. या आरोपीने इतरही ठिकाणी चोरी केल्याचे उघड होण्याची शक्यता निरीक्षक गिरी यांनी व्यक्त केली.