छत्रपती संभाजीनगर : भाजीपाला विक्रेत्याच्या घराचा दरवाजा तोडून चार चोरट्यांनी अल्पवयीन मुलास बेदम मारहाण करीत ४ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये लुटून नेले. ही घटना सुंदरवाडीत मंगळवारी पहाटे ३.२२ वाजता घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी दिली.
भाजीपाला विक्रेते संतोष बद्रिनाथ निरगुडे (रा. श्रीकृष्णनगर, सुंदरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी, मुलगा, मुलीसह राहतात. दररोजप्रमाणे सर्वांनी सोबत जेवण केल्यानंतर एका रुममध्ये पती, पत्नीसह मुलगी झोपली. समोरच्या खोलीत मुलगा शुभम हा झोपाला होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात प्रवेश करीत शुभमला लोखंडी गज, टांबी, कुऱ्हाड, चाकूने मारहाण सुरू केली. तेव्हा शुभमच्या मोठमोठ्याने ओरडण्याच्या आवाजाने आतमधल्या खोलीत झोपलेले त्याचे आई-वडिलसांसह उठले. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर शुभमला धरून चौघेजण मारहाण करीत होते. संतोष यांनी चौघांना तुम्हाला काय पाहिजे, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी तुमच्याकडे जे काही सोन्याचे दागिने, पैसे आहेत ते काढून देण्याच्या सूचना केल्या.
तसेच संतोष यांच्या पत्नी व मुलीच्या कानातील, अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. ते निघत नसल्याचे दिसताच त्यांनी दोघींना दागिने काढण्यास भाग पाडले. एकुण ४ तोळे ३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये चोरट्यांनी घेतले. त्यानंतर एकजण किचनमध्ये गेला. त्याने फ्रिज उघडून त्यातील पाण्याची बॉटल घेतली. चौघांनी पाणी पिल्यानंतर घरातुन पोबरा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक बालाजी ढगारे करीत आहेत.
दोन मोबाईल बेसीनमध्ये टाकलेचोरट्यांनी निघताना घरातील दोन मोबाईल उचलून घेतले. जाताना ते मोबाईल किचनमधील समाेरच्या भागातील बेसीनमध्ये टाकले. त्यावर पाण्याचा नळ सुरू करून सर्वजण पळून गेले. दरम्यान, हे चोरटे घराच्या समाेरील भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.