औरंगाबाद : पत्नी आजारी असल्यामुळे मुलासह भावाच्या घरी जेवणासाठी गेलेल्या ठेकेदाराच्या घरातील २ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी सकाळी ८ ते रात्री १० वाजेदरम्यान लंपास केली. ही घटना हर्सूल परिसरातील म्हसोबानगर येथे १७ डिसेंबर रोजी घडली. रविवारी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संतोष शिवरूपराव मोटेगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी दोन महिन्यांपासून आजारी असल्यामुळे गारखेडा परिसरात माहेरीच असते. शनिवारी त्यांचा मुलगा सकाळी शाळेत गेला. नंतर संतोषही कामानिमित्त बाहेर गेले. रात्री ते भावाच्या घरी मुलाला घेऊन जेवणासाठी गेले. तेव्हा त्यांना इमारतीत राहणाऱ्या एकाने फ्लॅटचे कुलूप तुटलेले असल्याचे फोन करून सांगितले. संतोष तत्काळ घरी आल्यानंतर कुलूप तुटलेले दिसले. आतमधील बेडरूममध्ये असलेल्या लॉकरची तोडफोड करण्यात आली होती. त्यातील कोणतीच वस्तू चोरीला गेली नव्हती. मात्र, दुसऱ्या बेडरूममधील कपाटात ठेवलेले २ लाख १० हजार रुपये लंपास झाल्याचे दिसले. हर्सूल पोलिस ठाण्याचे रफिक शेख तपास करीत आहेत.
ऐवज मिळणे दुरापास्तहर्सूल पोलिस ठाण्यात नियमितपणे चोरीच्या घटनांचे गुन्हे नोंदविण्यात येतात. मात्र, त्या चोरीच्या घटनांची उकल करण्यास हर्सूल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांना अपयश येत आहे. चोरट्यांना शोधून काढत ऐवज हस्तगत केल्याची कामगिरी मागील अनेक महिन्यांपासून निरीक्षकांनी केली नसल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होते.