छत्रपती संभाजीनगर : तिसराही मुलगाच झाला म्हणून पतीने ते स्वत:कडे ठेवून घेत नंतर भेटूही न दिल्याने तणावाखाली गेलेल्या बाळाची आई प्रियंका अनिल राठोड (२५) हिने आत्महत्या करत आयुष्य संपवले. याप्रकरणी पती अनिल पुनमचंद राठोड,सासरा रामजी,सासू शेवंतासह अन्य तिघांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल याला तत्काळ अटक केल्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले. हा सगळा प्रकार गरिबीमुळे झाला असून मुलांचा सांभाळ कसा करायचा? या विवंचनेतून ही घटना घडल्याची माहिती आहे.
प्रियंका यांचा भाऊ विशाल चव्हाण (२१) यांनी याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रियंका व अनिलचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना तीन मुले झाले.तिसरा मुलगा झाल्यानंतर मात्र पती व सासरच्यांनी प्रियंकाचा छळ सुरू केला. तिनही मुलांना स्वत:कडे ठेवत प्रियंकाला सासरच्यांनी घराबाहेर हाकलले.तेव्हापासून प्रियंका माहेरी राहत होती.पाच सहा महिने सातत्याने बाळ परत देण्याची मागणी करुनही प्रियंकाची बाळाशी भेट होऊ दिली नाही.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी प्रियंकाने पुन्हा बाळाला भेटण्याचा प्रयत्न केला.मात्र,तिला बाळ दिसलेही नाही. त्यानंतर तिने घर सोडले, त्यानंतर ती घरी परतलीच नाही.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता दुर्गडी तांडा शिवारातील हरी राठोड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत प्रियंकाचा मृतदेह आढळून आला. बाळाच्या भेटीसाठी व्याकूळलेल्या प्रियंकाने तणावाखाली जाऊनच आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर हर्सुल पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अनिलला अटक केली.अनिलने बाळ कोणाला दिले? का दिले? याचा तपास सुरू असल्याचे पोतदार यांनी सांगितले.