औरंगाबाद : गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले, याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशीरापर्यंत एकमेकांना करीत होते.
चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या परिसरात गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारे काही सिलिंडर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास यातील एक सिलिंडर अचानक फुटले. सिलिंडर फुटल्यानंतर उंच उडाले. त्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या काही भागाचे नूकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कोणी नव्हते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. आवाजामुळे अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १ वाजेच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.