- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गाठायची तर रस्त्याच्या संथ कामामुळे तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. छोट्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको, हवाई कनेक्टिव्हिटी नावालाच. ही परिस्थिती आहे ‘पर्यटन राजधानी’ आणि ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या औरंगाबादेची. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच औरंगाबादचा निश्चित विकास अपेक्षित आहे, मात्र पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊनही औरंगाबादचा पर्यटनदृष्ट्या विकास कागदावरच आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत.
दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. राज्य सरकारने २०१० मध्ये औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी औरंगाबाद ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला, मात्र आजही जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची माहिती पुरेशा पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही. जे पर्यटक या ठिकाणी जातात, त्यांनाही सोयी सुविधांअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. राज्य शासनाचे पर्यटन राजधानीकडे दुर्लक्ष होत असल्याने देश - विदेशातील पर्यटकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे, अशी ओरड होत आहे.
या स्थळांकडे कोणी लक्ष देणार का?औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटनस्थळे अजूनही दुर्लक्षित आहेत. या निसर्गसुंदर पर्यटनस्थळांची माहिती अनेकांना नाही. सुलिभंजन, अंतूर गड, जंजाळा किल्ला, पितळखोरे अशी ठिकाणे आता पर्यटकांना खुणावू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे जवळपास असल्याने पर्यटक आठवडा अखेरच्या सहलीसाठी पहिली पसंती देतात. मात्र, याठिकाणी सोयी सुविधांअभावी पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इतर देशांतील पर्यटनस्थळ विकासाप्रमाणे, स्वच्छता, परवडणारी हॉटेल, सुरक्षा, पायाभूत सुविधांची गरज आहे. पर्यटनस्थळे आणि परिसर विकसित केल्यास देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक संख्या वाढू शकेल.
सात वर्षांपासून हेलिकाॅप्टर सेवा ‘हवेतच’देशी- विदेशी पर्यटकांसाठी औरंगाबाद ते अजिंठा असे हेलिकॉप्टर सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हेलिकाॅप्टरची सेवा ‘हवेतच’ आहे.
रस्त्यामुळे पर्यटकांची पाठतीन वर्षांपासून औरंगाबाद-अजिंठा-जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या कामामुळे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही घटली असल्याची माहिती पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे म्हैसमाळसह इतर पर्यटनस्थळे गाठण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.
पर्यटकांची संख्या काय म्हणते?२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ५४ हजार ४०२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर २०१९-२०मध्ये केवळ ४३ हजार १३० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विदेशी पर्यटक आलेच नाहीत. २०१८-१९ मध्ये २३ लाख १ हजार १०० भारतीय पर्यटकांना तिकीट विक्री झाली. ही संख्या २०१९-२० मध्ये २० लाख ४४ हजार २१ वर आली. २०२०-२१ मध्ये पर्यटन बंद होते. जून ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ४ लाख २४ हजार ६०४ भारतीय आणि ४८४ विदेशी पर्यटकांनी भेट दिली.
‘डेडिकेटेड’ समिती स्थापनकाही दिवसांपूर्वीच ‘डेडिकेटेड’ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. यातून पर्यटनस्थळांसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी, क्षमता असलेल्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग, ‘टुरिझम हब’च्या दृष्टीने सूचना होतील. अजिंठा रस्त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी पर्यटनमंत्र्यांनी सूचना केली आहे.- डाॅ. श्रीमंत हारकर, उपसंचालक, प्रादेशिक पर्यटन संचालनालय
पर्यटनातील प्रश्न :- ‘बुद्धिस्ट सर्किट’साठी नियोजनाकडे दुर्लक्ष- ३ शहरांपुरती विमानसेवा, विमान कनेक्टिव्हिटीच नाही- वेरूळ, अजिंठाचेच मार्केटिंग, इतर स्थळांकडे दुर्लक्ष- मुंबईपुरतेच उत्सव पर्यटन, औरंगाबादकडे कानाडोळा- वेरूळ-अजिंठ्यातील अभ्यागत केंद्र बंद- वेरूळ लेणीत ई-वाहने, अजिंठा लेणीसाठी ‘एसटी’च्या जुन्या बसेस- जिल्ह्यातील जलाशयात बोटिंग सुविधेचा अभाव- रेल्वे स्टेशनवरील ‘टूरिस्ट इन्फर्मेशन काऊंटर’ बंद