करमाड : २ जुलै रोजी रात्री ट्रॅक्टर व दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान १२ जुलै रोजी संध्याकाळी मृत्यू झाला. आजिनाथ बद्रीनाथ आगलावे (वय २९, रा.कोनेवाडी ता जिल्हा औरंगाबाद ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयताच्या कुटुंबीयांनी अजिनाथचा मृतदेह १३ जुलै रोजी सकाळी करमाड पोलीस ठाण्यात आणून ट्रॅक्टर चालक राधाकिसन भेरे (वय २७) याला अटक करेपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यातून घेऊन जाणार नाही. असा निर्णय घेतल्याने पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण होते. करमाड पोलिसांनी या प्रकरणात कारवाईची आश्वासन दिल्यानंत मृतदेह घेऊन नातेवाईक निघून गेले
दोन जुलै रोजी रात्री करजगाव - कोनेवाडी गावच्या अंतर्गत रोडवर रात्री नऊ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी (MH20DP6250) ची समोरासमोर धडक झाल्याने आजिनाथ आगलावे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालया त उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी उपचार घेत असताना बुधवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील बद्रीनाथ आगलावे यांनी ३ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यामध्ये चालक राधाकिसन शिवशर्मा भेरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
आजिनाथ च्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील व भावकीतील सदस्य आक्रमक झाले व मृतदेह सरळ करमाड पोलीस ठाण्यात आणला, जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधीसाठी जाणार नाही. असा पावित्रा घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी चालका विरुद्ध पूर्वीच गुन्हा दाखल असल्याची माहिती नातेवाईकांना दिली. शिवाय कायद्यानुसार कलमात वाढ करून चालका विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यविधीसाठी कोनेवाडी येथे गेले. पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीड जमादार विट्ठल चव्हाण व त्यांचे सहकारी करत आहे. आजिनाथ हा अविवाहित असून यांच्या पाश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तो शेंद्रा एमआयडीसीतील कंपनीत कामाला जाऊन उदरनिर्वाह करत होता.