छत्रपती संभाजीनगर : तुम्ही वैष्णाेदेवीच्या दर्शनाला जम्मू-काश्मीरला जाण्याच्या विचारात असाल, तर जरा थांबा. कारण, शहरातच तुम्हाला डोंगरावरील वैष्णाेदेवीचे दर्शन होणार आहे. तेही याच गणेशोत्सवात.
कुठे उभारले जातेय मंदिरचिकलठाणा भव्य-दिव्य देखाव्याची ४२ वर्षांची परंपरा यंदाही जपत येथील सावता गणेश मंडळ ‘वैष्णाेदेवी मंदिरा’चा देखावा उभारत आहे. १ एकर जागेवर ३० फूट उंच देखावा तयार केला जात आहे. यासाठी कृत्रिम डोंगर बनविला जात आहे. त्यात पायऱ्या तयार करण्यात येणार आहेत. या पायऱ्यांवर चढून मग देवीचे दर्शन घडणार आहे.
२०० पेक्षा अधिक कार्यकर्ते कामालावैष्णाेदेवी मंदिराचा देखावा तयार करण्यासाठी सावता गणेश मंडळाचे २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यात शेतकरी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक असे सर्व स्तरातील युवकांचा समावेश आहे. ३० फूट उंच देखावा तयार करण्याची ही १० वी वेळ आहे. गणेशोत्सवात हा देखावा गणेशभक्तांमध्ये प्रिय होईल, अशी माहिती अध्यक्ष उमेश करवंदे यांनी दिली.
जाधवमंडीत ज्ञानेश्वर महाराज चालविणार भिंतजाधवमंडीतील यादगार गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा ५९ वर्षे आहे. यांत्रिकी चल देखावा या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील दोन प्रसंगांवर आधारित देखावा तयार केला जात आहे. यात ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह संत चांगदेवांना भेटण्यासाठी थेट भिंतीवर बसून जातात. भिंत चालवितानाचा हा देखावा व दुसरा प्रसंग मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळविण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. या घटेनला यंदा ७३७ वर्षे पूर्ण होत आहे. हा यांत्रिकी चल देखावा गणेशोत्सवात गणेशभक्तांना बघण्यास मिळणार आहे. त्याची स्टेज उभारणी सुरू झाली आहे, अशी माहिती गोपी घोडेले यांनी दिली.