औरंगाबाद : रेल्वे रुळाच्या शेजारून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत चालत जाणाऱ्या दोन युवकांना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नंदीग्राम एक्स्प्रेसने उडविल्याची घटना उघडकीस आली आहे. अठरा व वीस वर्षांच्या युवकांचा मृत्यू झाल्यामुळे मुकुंदनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. दोन्ही युवक पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.
तेजस राहुल जाधव (१८) आणि ऋषिकेश सुधाकर जाधव (२०, दोघे रा. मुकुंदनगर) अशी मृत युवकांची नावे आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस व ऋषिकेश हे दोघे मित्र होते. दोघे पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि तृतीय वर्षांला शिक्षण घेत. दहा वाजेच्या सुमारास दोघे जण नवरात्र उत्सव पाहून घरी परतत होते. गेट नंबर ५६ च्या पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते रेल्वे रुळाच्या जवळून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गाणे ऐकत जात असतानाच नंदीग्राम एक्स्प्रेस औरंगाबादहून नांदेडच्या दिशेने जात होती. दोघांनाही रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे दोघांना उडवून निघून गेली.
या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आले. तेव्हा निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांच्यासह इतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी दोघांच्या मृतदेहाचे तुकडे सर्वत्र पसरले होते. ओळख पटविण्यासाठी पोलिसांना परिसरातील नागरिकांनी मदत केली. त्यानंतर घाटी रुग्णालयात मृतदेह पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तेजस आई-वडिलांना एकुलतामृत तेजस हा आई-वडिलांना एकुलता मुलगा होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक आहेत. ऋषिकेशचे वडील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतात. दोन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे मुकुंदनगर परिसरात शोकाकुल वातावरण होते.