छत्रपती संभाजीनगर : १५ ऑगस्टला घराघरांवर तिरंगा ध्वज लावण्यात येतो. या झेंड्यासाठी लागणारे सॅटिनचे कापड पूर्वी चीन देशातून येई. मात्र, भारतीय वस्त्रोद्योगाने चीनची मक्तेदारी मोडीत काढली असून, गुजरातच्या सुरत व उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील पाॅवरलूममधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज बाजारात आले आहेत.
स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आणि बाजारपेठ तिरंगामय झाली आहे. कार्यालयांसाठी खादी ग्रामोद्योग भंडारातून ध्वज खरेदी केले जातात. मात्र, घरोघरी तसेच वाहनांवर जे तिरंगी झेंडे लावण्यात येणार आहेत, त्यासाठी बाजारात ‘सॅटिन’ व टेरिकॉट कपड्यापासून तयार केलेले झेंडे मोठ्या प्रमाणात आले आहेत. यात अवघ्या ६ इंचांपासून ते ६ फुटांपर्यंतच्या झेंड्यांचा समावेश आहे.
सुरतमधील तिरंगा झेंडा उत्पादक जितूभाई यांनी सांगितले की, कोरोनाच्या आधी चीनमधून तिरंग्यासाठी लागणारे सॅटिनचे कापड येई. मात्र आता सुरतमध्ये हजारो पाॅवरलूममध्ये तिरंगाचे कापड तयार होत आहे. येथे सॅटिन कापड तयार करून त्यावर तिरंगा रंग, अशोकचक्र प्रिंट केले जात आहे. तसेच गोरखपूर येथेही तिरंगा तयार केला जात असून तिथे टेरिकॉट कपड्याचा वापर केला जात आहे. ‘हर घर तिरंगा’ याअंतर्गत या दोन शहरांतून संपूर्ण भारतात तिरंगी झेंडे विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. खादीचे झेंडे महाग असून, त्या तुलनेत सॅटिनचे झेंडे स्वस्त असल्याने नागरिक ते खरेदी करीत आहेत.
शहरात विक्रीला पाच लाख झेंडेबाजारपेठेत लहान-मोठे पाच लाख झेंडे विक्रीला आहेत. ५ रुपये ते ३५० रुपयांपर्यंत किमती आहेत. तिरंगा यात्रेसाठीही मोठ्या प्रमाणात झेंडे विकले जात आहेत.- मयूर जव्हेरी, होलसेल व्यापारी
टोपी, दुपट्टा, टी-शर्ट तिरंगाबाजारात झेंडेच नव्हे, तर ज्यावर तिरंगा ध्वजाचे चित्र आहे असे पिनचे बॅच विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध झाले आहेत. २० ते ५० रुपयांपर्यंतचे हे बॅचेस आहेत. बाजारात यंदा गोल आकाराची प्लास्टिकची तिरंगी रंगातील टोपी आली आहे. याशिवाय तिरंगी दुपट्टा व टी-शर्टही हातोहात विकले जात आहेत. टोपी ३० रुपयांना, तर टी-शर्ट १२० ते २०० पर्यंत आहे.- संजय दौलताबादकर, व्यापारी