छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक प्रसूतीनंतर जुळ्यांना आठ दिवस घाटीतील नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर जुळे आणि मातेला गुरुवारी सुटी देण्यात आली. डाॅक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत कुटुंबीयांनी त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला आणि फुलांनी सजविलेल्या रिक्षातून बाळांना घरी नेले.
कोमल अमोल आठवले यांना प्रसूतीसाठी १५ मे रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १६ तारखेला त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली. त्यांना मुलगा आणि मुलगी झाली. जन्मानंतर दोन्ही बाळ रडले. परंतु उपचारासाठी दोन्ही शिशूंना ‘एनआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले. तर मातेला वाॅर्ड ३० मध्ये भरती करण्यात आले. उपचारानंतर दोन्ही जुळ्या शिशूंना २४ मे रोजी ‘एनआयसीयू’तून सुटी झाली. दोन्ही शिशूंसह गुरुवारी कोमल यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घाटी रुग्णालयातील प्रसूती विभाग, नवजात शिशू विभागात मिळालेल्या उपचाराविषयी या शिशूंच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी डाॅक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुलाबपुष्प देऊन डाॅक्टरांचे आभार मानले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रजनी कदम, डॉ. पवन कोकरे, डॉ. अर्घदीप सेन, डॉ.स्वाती बडगिरे, स्टाफ नर्स प्रतीक्षा साळवे आदींनी याही गुंतागुंतीची प्रसूती व उपचार केले.
आनंददायी क्षण, डाॅक्टरांचे आभारअमोल आठवले म्हणाले, आमच्यासाठी हा आनंददायी क्षण ठरला. आधी एक ६ वर्षांची मुलगी आहे. आता जुळे झाले. त्यामुळे डाॅक्टरांचे आभार मानून सजविलेल्या रिक्षांतून बाळांना घरी नेले.