औरंगाबाद : शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुणी महाविद्यालयाच्या समोरील रोडवर फोनवर बोलत होती. तेव्हा गाडे चौकाकडून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी तिच्या कानाला लावलेला मोबाईल हिसकावुन पोबारा केला. याची माहिती वेदांतनगर पोलिसांना हाेताच त्यांनी दोन तासांच्या आत चोरट्यांना अटक करीत चोरलेला मोबाईल परत मिळविल्याची माहिती निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.
कोमल सुनील नांदुरे (रा. बन्सीलाल नगर) ही विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या समोरील रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर बुधवारी दुपारी दोन ते आडीच वाजेच्या सुमारास बोलत होती. तेव्हा गाडे चौकाकडून दुचाकी (एमएच २० ईएक्स ०६७७) वर आलेल्या दोघांनी तिच्या कानाचा मोबाईल हिसकावला. विद्यार्थिनीने आरडाओरड केली. तसेच दुचाकीचा नंबर व मोबाईल पळविणाऱ्यांची चेहरेपट्टी सांगितली. तिच्या मित्रापैकी एकाने वेदांतनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
तेव्हा विशेष पथकातील अंमलदार जमीर बाबु तडवी व अमोल अंभोरे यांनी विद्यार्थिनीने सांगितलेल्या वर्णनानुसार चोरट्याचा तपास सुरु केला. तेव्हा अमन बेग सलीम बेग (१८, रा. पिली कॉलनी, चंपा चौक), शेख जुबेर अती अहेमद (रा. बुढीलाईन, कबाडीपुरा) या दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातुन चोरीसाठी वापरलेली दुचाकी, विद्यार्थिनीचा हिसकावलेला महागडा मोबाईलसह त्यांच्याकडील इतर साहित्य जप्त केले. त्याची किंमत १ लाख ३१ हजार रुपये एवढी असल्याचे निरीक्षक सानप यांनी सांगितले. ही कामगिरी निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रमोद देवकते, अंमलदार जमीर बाबु तडवी, अमोल अंभोरे यांनी केली.