औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी अखेर मरगळ झटकली. विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र देण्यास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे सुमारे ७०० विद्यार्थ्यांना सारथीसह अन्य संस्थांकडून फेलोशिप मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘सारथी’ने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रावृत्तीसाठी प्राप्त संशोधक विद्यार्थ्यांची यादी चार दिवसांपूर्वी जाहीर केली होती. कागदपत्रांची त्रुटी असलेल्या यादीत बहुसंख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र सादर केले नसल्याचे ‘सारथी’ने कळविले आहे. दरम्यान, पीएच.डी. प्रवेशासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सध्या तात्पुरते प्रवेशपत्र (प्रोव्हीजनल ॲडमिशन लेटर) दिलेले आहे. पीएच.डी. प्री कोर्सवर्क पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना कायम नोंदणीपत्र देण्याचा विद्यापीठाचा ऑर्डिनन्स (नियम) आहे. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते.
तथापि, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक संशोधक विद्यार्थी तसेच अन्य विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन, विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र देण्याची मागणी केली होती. तेव्हा कुलगुरूंनी विद्यार्थी हितासाठी मंगळवारी निर्णय घेतला की, विद्यार्थ्यांकडून पीएच.डी. प्री कोर्सवर्क पूर्ण करण्याचे हमीपत्र घेऊन सुमारे ७०० विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र दोन दिवसांत वाटप केले जातील.
२५ मेपर्यंत पीएच.डी.ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण कराकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, विद्यार्थी हितासाठी नियम आडवे येत असतील तर काही वेळा नियम बाजूला ठेवावे लागतात. त्या दृष्टिकोनातून हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र दिले जाईल. पीएच.डी. प्रवेशासाठी आणखी काही विद्यार्थ्यांची ‘डीआरसी’, ‘आरआरसी’ राहिली आहे. काही विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध नाहीत. आता २५ मेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.