पैठण ( औरंगाबाद): पैठण शहरातील बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री अभूतपूर्व उत्साहात रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जयभीमच्या गगनभेदी घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्याने अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी पुतळा परिसरात येऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सोमवारी तालुक्यातील चितेगाव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होते. चितेगाव ते पैठण दरम्यान रस्त्यावरील गावांगावांमध्ये सडा रांगोळी, कमाणी उभारून पेढे वाटत पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
चितेगाव येथून पुतळा पैठण शहरात पोहचेपर्यंत तब्बल १२ तासाचा कालावधी लागला. पैठण शहरात पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी सह्याद्री चौकात रात्रीचे १२ वाजलेले असतानाही महिला-पुरूष व तरूणांचा जनसागर उसळला. पुतळ्याचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत तरूणांनी जल्लोष केला. सह्याद्री चौक ते बसस्थानकापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूने नागरीकांनी पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. रस्त्यावरील रोषणाई व उपस्थितीने रात्रीचा दिवस झाला होता.
प्रत्येकाच्या मनामनात उत्साह संचारलेला दिसून आला. १३ फुट ऊंची असलेल्या लक्षवेधी पुतळ्याची निर्मिती अहमदनगर व कोल्हापूर येथील शिल्पकारांनी केली आहे. पुतळ्यासाठी रोहयो तथा संदिपान भुमरे यांनी स्वखर्चातुन १८ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. पैठण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणीच हा भव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून दोन टप्प्यात ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी या निधीची तरतुद करून दिली असून सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
मिरवणूकीचे ठिकठिकाणी स्वागत.....ढोलताशे, भगवे-निळे ध्वज व तुताऱ्यासह गुलाल व निळ ऊधळीत फटाक्यांच्या आतिषबाजीत कौडगाव, ढोरकीन, धनगाव, ईसारवाडी, एमआयडीसी, मुधलवाडी, पिंपळवाडी व कातपूर राहुलनगर येथील ग्रामस्थांनी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना औरंगाबादचे आमदार संजय सीरसाठ, आमदार अंबादास दानवे यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.