औरंगाबाद : शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chatrapati Shivaji Maharaj's Statue in Aurangabad ) अश्वारूढ पुतळा शहरात दाखल झाला. थंडीच्या कडाक्याची पर्वा न करता हजारो शिवप्रेमी पुतळ्याच्या आगमनाचे साक्षीदार ठरले. चौथऱ्यावर लवकरच पुतळा बसविण्यात येणार असून सध्या येथे वेगाने काम सुरु आहे.
मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून औरंगाबादकडे निघाला. शनिवारी रात्री नेवासा येथे पुतळा थांबविण्यात आला. रविवारी पहाटे वाळूजपासून पुढे एका पेट्रोल पंपावर पुतळा थांबविण्यात आला. दिवसा शहरातील वाहतूक लक्षात घेत रात्री ११. ४५ वाजेच्या दरम्यान पुतळा शहरात आणण्यात आला. पुतळा आणताना क्रांतिचौक परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. ट्रेलरमधून पुतळा खाली उतरविण्यासाठी मोठ-मोठे क्रेन मागविण्यात आले होते. पुतळ्याची लांबी २१ फुटांपेक्षा जास्त आहे.क्रेनच्या सहाय्याने पुतळा काळजीपूर्वक ट्रेलरमधून खाली घेण्यात आला. आज सकाळपासून क्रांतिचौकात पुतळ्याचे उर्वरित काम संबंधित कलाकाराकडून पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चौथऱ्यावर पुतळा बसविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी किती वेळ लागेल हे निश्चित नाही, असेही मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्रांतिचौकात शिवसृष्टीक्रांतिचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तब्बल ३१ फूट उंचीचा चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झाले. या परिसरात लवकरच म्युरल्सही बसविण्यात येत आहेत. चौथऱ्यावर तब्बल २१ फूट उंच पुतळा उभारण्यात येईल. पुण्याच्या चित्रकल्पक आर्ट येथे पुतळा तयार करण्यात आला. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजयंती आहे. त्यापूर्वी सर्व कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला. पुतळ्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आले.