वाळूज महानगर : नातेवाइकाच्या रिसेप्शनहून परतत असताना दुचाकी दुभाजकावर धडकून विरुद्ध दिशेने पडल्याने कंटेनरखाली सापडून तरुण ठार झाला. तर दोघे जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव पथकर नाक्याजवळ घडली.
या अपघातात तौफिक रफिक शेख (१७, रा. बिडकीन) हा मयत झाला असून दोन जण जखमी झाले. बिडकीन येथून वधूचे नातेवाईक स्वागत समारंभासाठी लिंबे जळगावला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर तालेब नसीर पठाण, तौफिक रफिक शेख व अन्य एक असे तिघे दुचाकी (क्र. एम. एच. २० यू. एफ. १६५१) वर परतत होते. पथकर नाक्याच्या पुढे आल्यावर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर धडकली. दुचाकी दुभाजकावर धडकताच पाठीमागे बसलेला तौफिक शेख हा विरुद्ध दिशेने रोडवर पडला.
याच वेळी नगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्र. एच. आर. ५८ बी १४१९) च्या चाकाखाली सापडून ठार झाला. दुचाकीवरून पडल्याने तालेब व अन्य एक जण जखमी झाले. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोहेकाॅ जगदीश खंडाळकर व त्याच्या सहकाऱ्यांनी जखमींना शासकीय दवाखान्यात हलवले. पोलिसांनी कंटेनर चालक अतिक इसरार यास ताब्यात घेतले आहे.