- श्रीकांत पोफळेकरमाड : करमाड येथील दर्ग्याजवळ अपघाती वळण आहे. या अपघाती वळणावर रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आढळली. या अपघातात अभिजीत मधुकर वाघमारे (२५, रा. गोरेगाव (तारो) ता. भोकरदन जि. जालना) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.
रविवारी रात्री विना क्रमांकाची चारचाकी गाडी जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जात होती. करमाड गावा पुढे दर्ग्यासमोरील पुलाजवळ वळण रस्ता आहे. तिथे पावसाचे पाणी साचलेले आहे. भरधाव वेगातील कार चालकाला हा वळण रस्ता निदर्शनात आला नसावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातावेळी कारमध्ये फक्त चालक अभिजीत वाघमारे हा एकटाच होता. कार इतक्या जोरात झाडावर आदळली की, चालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नाईट पेट्रोलिंगला असलेले पो.हे.कॉ सुनीलकुमार लहाणे, पो.ना. सागर मडावी यांनी घटनास्थळी घेतली. भर पावसात क्रेनच्या मदतीने दीड तास प्रयत्न करून वाघमारे यांना कारच्या बाहेर काढले. यावेळी सपोनी डीडी बनसोडे, चालक बिघोत देखील उपस्थित होते.
करमाड जवळ असलेल्या या अपघाती वळणावर डांबररोड पेक्षा बाजूचा सखलभागाची उंची आहे. शिवाय या ठिकाणी रोडवरील खोलगट भागात पावसाचे पाणी साचते. हिवरा फाट्यापासून वाहत येणारे खडी या ठिकाणी डांबर रोडवर जमा होते. पावसात एखाद्या मोठ्या अवजड वाहनाचे पाणी कारच्या काचेवर उडाले. तर कार चालकाला थोडा वेळ काहीच दिसत नाही. रोडवर जमा झालेली खडी पाऊस उघडल्यानंतर अवजड वाहनांमुळे उडून दुचाकीस्वारांना देखील या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करमाड पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.