औरंगाबाद : जैन समाजातील ज्येष्ठ सदस्य कुलभूषण फुलचंद कासलीवाल (वय ६७) यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. थोरल्या भावाच्या निधनाने अत्यंत दु:खी झालेल्या किरण कासलीवाल या धाकट्या भावानेही तीन दिवसांच्या अंतराने प्राण सोडले.
या घटनेने अरिहंतनगरासह समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलभूषण यांचे समाजाचे कार्य देशव्यापी होते. त्यांचे धाकटे बंधू किरण फुलचंद कासलीवाल (६४) हे नाशिक येथे स्थाायिक झाले होते. थोरल्या बंधूंच्या निधनाच्या वृत्ताने त्यांनी औरंगाबाद गाठले. ते किमान दहा दिवस औरंगाबादलाच मुक्काम करणार होते. ज्या थोरल्या बंधूची भक्कम साथ मिळाली आणि ते आपल्याला सोडून गेले, याचा विरह त्यांना सहन झाला नाही. त्यांचे तीनच दिवसांनी बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.
कुलभूषण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. किरण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दोघांवरही कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी आलेल्यांत या बंधूप्रेमाची चर्चा होती.