वाळूज महानगर : वाळूज शिवारातून ३५ हजारांचा कृषिपंपाची चोरी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊलाल श्यामसिंग सुंदर्डे (रा.नायगाव-खंडेवाडी) यांची वाळूज शिवारात शेती आहे. सोमवारी (दि. २६) सकाळी भाऊलाल हे शेतात गेले असता त्यांना ३५ हजारांचा कृषिपंप गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------
रांजणगावातून महिला बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून २२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. काजल आकाश दिवेकर ही शुक्रवारी (दि. २३) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही पत्नी मिळून न आल्याने आकाश दिवेकर यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
फोटो - काजल दिवेकर
---
वडगाव-सिडको रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : वडगाव ते सिडको वाळूज महानगर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर सांडपाणीही वाहत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खड्डे दिसत नसल्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून होत आहे.
-------
वाळूजला वाहतुकीची कोंडी
वाळूज महानगर : वाळूजला विविध व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे थाटल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर फळविक्रेते व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. याच बरोबर रिक्षाचालक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
---
बजाजनगरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
वाळूज महानगर : बजाजनगरात पॉलिथीन पिशव्यांचा वापर वाढल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे. या परिसरातील किराणा दुकाने, मॉल, भाजी मंडई आदी ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्रासपणे पॉलिथीन पिशव्यात सामान भरून देत असतात. या परिसरात पॉलिथीन पिशव्यांचा वापर वाढला असून, प्रदूषण मंडळाचे अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
------