- एकनाथ मतकर
औरंगाबाद : वैजापूर, गंगापूर, खुलताबाद या तिन्ही तालुक्यांच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे दोन संशयित दरोडेखोरांना जमावाने यमसदनी पाठविण्याची घटना घडली. तालुक्यातील रोटेगाव या मार्गावर रेल्वेस्टेशन आहे. काही अंतरावर दौलताबाद, पोटूळ, लासूर, करंजगाव, परसोडा ही रेल्वेस्थानके आहेत. या पाच रेल्वेस्थानकांपैकी लासूर रेल्वेस्टेशन सोडले, तर बाकी चारही रेल्वेस्टेशन्स रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असतात.
याचाच फायदा घेत दरोडेखोर औरंगाबादेतील रेल्वेस्थानकावरून या मार्गावर कोठेही रेल्वेची चेन ओढून उतरून परिसरात लुटमार करून पुन्हा रेल्वेने प्रवास करून पोबारा करतात. ग्रामस्थांनी तक्रारी करूनही पोलिसांना या दरोडेखोरांचा काहीही सुगावा लागत नाही. वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर, परसोडा कारखाना भागात या चोरट्यांनी यापूर्वी दहशत माजवून चोऱ्या केल्या आहेत, तर वेरूळ परिसरात सध्या रात्रीची गस्त घालून नागरिक स्वसंरक्षण करीत आहेत.
गंगापूर-वैजापूर, खुलताबाद तालुक्यांतील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झालेली असून गंगापूर तालुक्यातील वरखेड पाटी ते महालगावपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने वाहनचालकांना तेवढ्या जागेत वाहनांचा वेग कमी करावा. या रस्त्यावर पोलिसांची कधीही पेट्रोलिंग होताना दिसत नाही. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव व वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथे पोलीस स्टेशन आहे; मात्र पोलीस स्टेशन्स मेनरोडपासून १० कि़मी.अंतरावर आहेत. महालगाव ते चोरवाघलगाव एवढ्या अंतरावरही चोरट्यांनी बऱ्याचवेळा वाहनधारकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
पाणी मागण्याच्या बहाण्याने हेरगिरीचोर-दरोडेखोर दिवसा ग्रामीण भागात पाणी मागण्याच्या निमित्ताने हेरगिरी करातात व रात्री लुटमार करतात. सणासुदीच्या काळात ग्रामीण भाग दहशतीखाली आला आहे. हे दरोडेखोर अंगावर आॅईल किंवा तेल लावून येत असल्यामुळे त्यांना कोणी पकडण्याचा प्रयत्न के ला तर ते हातातून निसटून पळतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.