वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरातील कासोडा, एकलहेरा व नांदेडा शिवारात खाजगी शेतात अवैधरित्या उत्खनन करुन वाळूची विक्री केली जात आहे. वाळू चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
या परिसरातील कासोडा, एकलहेरा व नांदेडा शिवारातील शेतात दिवस-रात्र जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उत्खनन करुन वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. या परिसरात दररोज वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा, ट्रक, टॅक्टरची वर्दळ वाढली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीन असलेले वाळूच्या साठ्याची विक्री सुरु केली आहे.
वाळूमाफिया व महसुल विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरुन वाळूची वाहतूक खुलेआमपणे सुरु आहे. बहुतांश ठिकाणी वाळू पट्ट्याचे लिलाव न झाल्यामुळे वाळू माफियांनी शेतकºयांना पैशाचे आमिष दाखवून शेतातील वाळू उत्खनन सुरु केले आहे.
वाळू वाहतूक करणाºया वाहनांमुळे या परिसरातील रस्त्याची वाट लागत असून, ठिक-ठिकाणी खड्डे पडत आहेत. परिसरात सुरु असलेली वाळू चोरी थांबविण्यात यावी, यासाठी काँग्रेसचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष सारंगधर जाधव, कासोडाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर नवले यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्यावा आरोप जाधव, नवले यांनी केला आहे. या भागातील वाळूचे उत्खनन व विक्री करणाºया शेतमालक व वाळूमाफियाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.