लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्यासारख्या संवेदनशील विषय जर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी गांभीर्याने घेत नसतील, केंद्रात वारंवार गैरहजर राहत असतील संबंधितांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी दिले. गुरूवारी स्थायी समितीची पहिलीच सभा झाली. जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेला सुरूवात झाली. नूतन सदस्यांची ही पहिलीच स्थायी समितीची सभा असल्याने प्रत्येक सदस्यांचे यावेळी सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांनी पूष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकारी कार्य अधिकारी दीपक चौधरी, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, शिक्षण सभापती रघुनाथ तौर, समाजकल्याण सभापती दत्ता बनसोडे, कृषी सभापती जिजाबाई कळंबे, महिला बालकल्याण सभापती सुमन घुगे, बप्पासाहेब गोल्डे, आशा पांडे, शालिकराम म्हस्के, अवधूत खडके, जयमंगल जाधव आदी सदस्यांची उपस्थिती होती. घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड सर्कलचे सदस्य जयमंगल जाधव यांनी परिसरातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी केंद्रात उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. लोकसभागातून जिल्ह्यातील अनेक शाळा ई लर्निग करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरवस्था आहे. लोकवर्गणीतून देण्यात आलेले साहित्य ठेवण्यासाठी सुध्दा काही शाळांमध्ये योग्य जागाच नसल्याचे बप्पासाहेब गोल्डे यांनी आक्षेप घेतला आणि पावसाळा सुरू होण्याची आधी वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याची मागणी केली. सध्या जिल्ह्यात सुरू असलेली शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया योग्य नसून याला आमचा विरोध आहे. समायोजनेची प्रक्रिया थांबविण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अवधूत खडके आणि शालिकराव म्हस्के यांनी उपस्थित केला. ही सर्व प्रक्रिया शासनाच्या सूचनेनुसारच होत आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी आरोपांचे खंडन केले.
तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: May 19, 2017 12:25 AM