औरंगाबाद : सिमेंट, लोखंडाच्या पाठोपाठ वाळू, खडीच्या क्रशरच्या अवाजवी भाववाढीने बांधकाम क्षेत्र संकटात सापडले आहे. कोरोनामुळे आधीच या क्षेत्राची गती मंदावली असताना बांधकाम साहित्यातील भाववाढीने घर बांधणीचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, शहरात सुरू असलेली सर्व बांधकामे ठप्प पडण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रावर अवलंबून लहान-मोठ्या सुमारे ३५० उद्योगाच्या अर्थचक्राला धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे सर्वांना स्वस्त घरे ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्य सरकारही त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, घर बांधणीत अडचण निर्माण केली ते सिमेंट, लोखंड उत्पादक कंपन्यांनी, त्यात आता भर पडली ते क्रशर व्यावसायिकांची. डिझेल, कामगाराची मजुरी वाढल्याने स्थानिक क्रशर व्यावसायिकांनी एकत्र येऊन वाळू, खडीच्या दरात ६० टक्क्यांनी वाढ केली. यामुळे बांधकामाचे बजेट कोलमडणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटदार अडचणीत सापडला आहे. याचे गांभीर्य ओळखून बुधवारी बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ व ‘असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर्स’चे पदाधिकारी एकत्र आले. बांधकाम साहित्याच्या भाववाढीवर सर्वांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले की, काही दिवस आधी २२०० रुपये प्रति ब्रास क्रश विकला जात होता. एकाच दिवसात ब्रासमागे १३०० रुपयांची वाढ करण्यात आली व आजघडीला दर ३५०० रुपये ब्रास झाला आहे. बांधकामाचे बजेट बिघडले असून, सर्व बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असे ते म्हणाले. जोपर्यंत क्रशरची भाववाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत बांधकाम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या बैठकीत क्रेडाईचे राजेंद्रसिंग जबिंदा, नरेंद्रसिंग जबिंदा, विकास चौधरी, भास्कर चौधरी, पंजाबराव तौर, श्वेता भारतीया तसेच आयसा संघटनेचे गणेश मोटे, राघवेंद्र बगडिया, अनंत मल, मिलिंद थोरात, राजेश भारुका, संजय मोरे, आदी पदाधिकारी हजर होते.
चौकट
औद्योगिक कंत्राटदारांसमोर संकट
आयसा संघटनेचे अध्यक्ष कल्याण वाघमारे यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांचे कंपन्यांशी झालेल्या करारानुसार जुन्या दरातच काम करावे लागत आहे. मात्र, क्रशरवाल्यांनी एकदम ६० टक्के वाढ केल्याने त्याचा मोठा फटका कंत्राटदारांना बसत असून, कंत्राटदार संकटात सापडले आहेत.