औरंगाबाद : माणसाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. कदाचित आपण आजच झाडे लावली नाही तर पुढच्या पिढ्यांना आॅक्सिजनच्या बाटल्या विकत घेऊन त्या गळ्यात घालून फिरण्याची वेळ येईल, अशी भीती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, वन विभागाचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुंजे यांची उपस्थिती होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्व्हायर्मेंट रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. दिलीप यार्दी, सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक, वुई फॉर इन्व्हायर्मेंटच्या मेघना बडजाते, मराठवाडा इन्व्हायर्मेंट केअर क्लस्टरचे बी. एस. खोसे, प्रयास युथ फाऊंडेशनचे अभिषेक पगारे, निसर्ग संवर्धन मंडळाचे राजेंद्र धोंगडे यांनी सादरीकरणाद्वारे त्यांच्या कार्याची माहिती दिली. यंदा १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी झाडे लावायची आहेत. ही झाडे केवळ लावायची नसून ती पुढे जगवायचीही आहेत. लोकसहभागाशिवाय एवढी झाडे जगविणे शक्य नाही, असे सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण म्हणाले.
...तर आॅक्सिजन सोबत घेऊन फिरावे लागेल
By admin | Published: June 05, 2016 11:40 PM