शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. आता, सत्तार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
शेवटी संस्कार आहेत, एखाद्या राज्यकर्त्याचा स्वत:च्या मंत्रिमंडळातील वचक कमी होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, पहिल्यांदा शिवी दिली तर समजू शकतो की चुकून निघाली असेल. पण दुसऱ्यांदा तसंच बोलणं आणि त्या विधानावर ठाम राहणं. जर सरकारने यांचा राजीनामा घेतला नाही, यांना पदमुक्त केलं नाही, तर भाजप महिला सुरक्षितेबाबत गंभीर नाही, हा संदेश देशात जाईल, असे म्हणत आदित्य ठाकरेंनीअब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
प्रकाश सुर्वे, गुलाबराव पाटील आणि आता अब्दुल सत्तार काहीही बोलत आहेत, मी जर मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतो तर मी सरकारमधून बाहेर पडलो असतो. कारण, यात देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतंय. मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, त्यामुळे त्यांना सल्ला काय देणार. पण, देवेंद्रजींच्या जागी मी असतो तर सरकारमधून बाहेर पडलो असतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधला. तसेच, ४० आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणत यांच्यावर कुठेही कारवाई होत नसल्याचेही आदित्य म्हणाले.
अशी लोकं तुम्हाला हवी आहेत का?
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.