औरंगाबाद : स्थानिक नोंदीत शेतकऱ्यांचा ऊस न घेता बीड जिल्ह्यातील साखर कारखाने परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. उसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे भाव मिळावा, या अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी क्रांतीचौकातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे पाटील यांनी येथे दिला.
क्रांतीचौक येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात गुरुवारी माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सांगण्यात आले की, ५ जानेवारी रोजी कार्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) योगिराज सुर्वे, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी व शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष गंगाभीषण थावरे पाटील यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील ऊस खरेदी करावा, तसेच पश्चिम महाराष्ट्रतील साखर कारखान्याप्रमाणे उसाला दर देण्यात यावा व एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम देण्यात यावी, को-२६५ जातीचा ऊस हा मान्यताप्राप्त असल्यामुळे त्याची नोंद घेण्यात यावी, असे आदेश कारखान्याच्या प्रतिनिधीला बैठकीत दिले होते; पण आजपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी कारखान्यांनी केली नाही. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास २६ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील शेतकरी औरंगाबादमध्ये दाखल होतील व ध्वजारोहण झाल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
चौकट
शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या
ऊस नोंदीनुसार तोडणीसाठी ऑनलाइन स्लिप निघत नसेल, तर अशा परिस्थितीत कारखान्यांनी ऑफलाइन स्लिप द्यावी.
कारखान्याकडून ऊस उतारा कमी दर्शविला जातो. यासाठी समिती नेमण्यात यावी.
ऊस गाळपाला आल्यानंतर एफआरपीची रक्कम १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावी.