औरंगाबाद : या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच ‘सबका विकास व सबका साथ’ देण्याचा प्रयत्न केला. मतदानाचा अधिकार व लोकशाही निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला हे कुणी नाकारू शकत नाही. आज देशात ‘डर’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली हक्काची वर्णव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन शुक्रवारी येथे प्रख्यात पत्रकार व न्या. लोया यांचा खून उघडकीस आणल्यामुळे देशभर गाजलेले निरंजन टकले यांनी केले. मूकनायक शताब्दीनिमित्त शुक्रवारपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे टकले हे पहिले पुष्प गुंफत होते.
महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित पीईएसच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. टकले म्हणाले, शेवटी तिरस्काराचा नाश अटळ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचाच विजय होणार आहे. ‘गवत आहे मी, तुमच्या सगळ्या विध्वंसावर उगवून येईन’ ही कविता सादर करून त्यांनी आपले व्याख्यान टाळ्यांच्या कडकडाटात संपवले.
कार्यक्रम सुरू होईपर्यंत राजाभाऊ सिरसाट व संचाने बुद्ध व भीमगीते सादर केली. प्रबुद्ध म्हस्के यांनी क्रांतीगीत गायिले. तत्पूर्वी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मूकनायक व बाबासाहेबांची प्रतिमा देऊन टकले, गव्हाणे व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिजित वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मूकनायकवर गणेश शिंदे यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर मगर यांनी प्रास्ताविक केले. लोया खून प्रकरण, त्यातील बारकावे, तपासातील अनेक विसंगती याकडे उपस्थितांचे टकले यांनी लक्ष वेधले. जुने दिवस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सीएए व एनआरसीला सर्वांनी विरोध केलाच पाहिजे, असे आवाहन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
राज्याच्या गृहमंत्र्यांना हे माहीत असायलाच हवे न्या. लोया प्रकरणाचा उल्लेख करताना राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टकले यांनी खरपूस समाचार घेतला. अनिल देशमुख म्हणताहेत की, लोया प्रकरणाचे पुरावे आमच्यापर्यंत आलेच नाहीत. कमाल आहे. मी नाशिकच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे त्याचवेळी सर्व पुराव्यानिशी लेखी तक्रार केली आहे. तरी देशमुख याची माहिती करून न घेता पुरावे मागत असतील तर याला काय म्हणावे?